मेहुल चोक्सीला तुरूंगात पाठविण्याच्या आदेश, भारतात प्रत्यार्पणाच्या आशा वाढल्या

0

- Advertisement -

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात फरार हिरा व्यापारी मेहुल चोक्सीच्या अडचणी वाढू शकतात. गुरुवारी डोमिनिका कोर्टाने मेहुल चोक्सीला सरकारी तुरूंगात पाठविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सध्या तो हॉस्पिटलमध्येच राहील. मेहुल चोक्सीची तब्येत खूपच खराब आहे आणि प्रकृती सुधारल्यानंतरच त्याला तुरूंगात पाठविले जाईल, असे त्याच्या वकिलाने म्हटले आहे.

न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान चोक्सीच्या वकिलांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले. त्यात त्याला उच्च रक्तदाब असल्याचे तसेच तो मानसिक ताणतणावातही असल्याचेही म्हटले आहे. सध्या मेहुल चोक्सी डोमिनिका-चीन फ्रेंडशिप हॉस्पिटलमध्ये आहे. त्यामुळे तब्येत सुधारल्यानंतर तुरुंगात पाठविण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यापूर्वी मेहुल चोक्सी पोलिस कोठडीत होता. पण आता त्याला तुरूंगात पाठविण्याच्या आदेशाला भारतात प्रत्यार्पणासाठी आशेचा किरण म्हणून पाहिले जात आहे. यापूर्वी चोक्सीची जामीन याचिका फेटाळण्यात आली होती.

- Advertisement -

पंजाब नॅशनल बँकेच्या सुमारे 13,500 कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूकीच्या प्रकरणात चोक्सी भारतात वॉन्टेड आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने (CBI) मेहुल चोक्सी आणि त्याची कंपनी गीतांजली जेम्स सहित अन्य 21 जणांविरूद्ध पुरावा नष्ट केल्याचा आरोप ठेवत आरोपपत्र दाखल केले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, फरार हिरा व्यापारी मेहुल चोक्सीच्या लवकर प्रत्यार्पणाच्या किंवा हस्तांतरणाच्या संदर्भात भारत सरकार डोमिनिका सरकारशी सक्रिय चर्चेत आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले की, “मेहुल चोक्सी सध्या डोमिनिका येथे ताब्यात आहे आणि त्याच्याविरूद्ध तेथे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.”

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.