या राज्यांत झालाय डेंग्यू, विषाणूजन्य तापाचा कहर, रविवारपर्यंत 114 लोकांचा मृत्यु त्यात 88 मुले

0

- Advertisement -

फिरोजाबाद: पश्चिम उत्तर प्रदेश मधील फिरोजाबाद जिल्ह्यात डेग्यू आणि विषाणूजन्य तापाने थैमान घातले आहे, ज्यामुळे फिरोजाबादमध्ये परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. सध्या सुमारे 12 हजार रूग्णांवर डेंग्यू आणि विषाणूजन्य तापावर उपचार सुरु आहेत. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार संपूर्ण जिल्हा या रोगाच्या कचाट्यात सापडला आहे. त्याचबरोबर, गेल्या 24 तासांत येथे आणखी 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इंडीया इन या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार जिल्ह्यात गेल्या रविवार पर्यंत एकूण 114 नागरिकांचा मृत्यु झाला असून त्यात 88 मुलांचा समावेश आहे.

गेल्या आठवड्यात राष्ट्रीय रोग प्रतिबंधक व नियंत्रण केंद्राच्या (NCDC) टीमने फिरोजाबाद मधील परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यात त्यांनी पुर्ण जिल्ह्यात डेंग्यू तसेच विषाणूजन्य ताप म्हणजेच व्हायरल फिव्हर ची साथ असल्याचे स्पष्ट केले होते. या आजाराने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली सध्या 12 हजारांहून अधिक डेंग्यूचे रुग्ण सरकारी रुग्णालयात दाखल आहेत. या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने औषध फवारणी करत असून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत असल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

काल सोमवारी (13 सप्टेंबर) हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्यामुळे एका मुलाचा मृत्यू झाला होता. मुलाला अतिशय ताप येत होता, त्या दरम्यान त्याला रुग्णालयात बेड देण्यात आला नाही. वैद्यकीय महाविद्यालयाचे सीएमओ डॉ.हंसराज यांनी सांगितले आहे की या संदर्भात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात बेडची व्यवस्था केली जात आहे. डेंग्यूचे बहुतेक मृत मुले 15 वर्षांखालील वयाची आहेत.

- Advertisement -

डेंग्यू, व्हायरल ताप आणि न्यूमोनिया केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर बिहारमध्येही पसरत आहे. बिहारमध्ये तीनशेहून अधिक मुले व्हायरल आणि न्यूमोनियामुळे त्रस्त आहेत. काहींची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही परिस्थिती गंभीर असल्याचे मान्य केले आहे. सर्वांना सतर्क राहण्यास सांगितले आहे, असे वृत्त एनडीटिव्हीने दिले आहे.

दरम्यान आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून डेंगूसारख्या वेक्टर-जनित रोगांच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी प्रशासकिय यंत्रणांना सज्ज राहण्यावर व वैद्यकीय सुविधा वाढविण्यावर भर देण्यास प्राधान्य देण्याचे सुचित केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.