राज्यातील दुकाने, उपाहारगृहांच्या वेळा वाढणार, टास्क फोर्सच्या बैठकीत निर्देश

0

- Advertisement -

मुंबई: राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात आज टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करून त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.आला. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टास्क फोर्ससह विविध विभागांच्या सचिवांचाही सहभाग होता.

तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राइड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्समधील पाण्यातल्या राइड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. लहान मुलांच्या डॉक्टरांच्या टास्क फोर्सचे सदस्य देखील या बैठकीला उपस्थित होते. अम्युझमेंट पार्क देखील २२ ऑक्टोबर पासून सुरू होतील, असे स्पष्ट करण्यात आले.

- Advertisement -

कोविड व्यतिरिक्त डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून त्यांच्या उपचारांकडे देखील पुरेसे लक्ष द्यावे अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत केली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, आपण हळूहळू निर्बंध शिथील करीत असून रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. २२ ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहेही सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांच्या वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे.

मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेणे तसेच याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागास केल्या. करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम असून नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक आहे, असे स्पष्ट करीत लोकांनी याबाबतीत बेसावध राहू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. करोनावरील उपचारांसाठी जगात नवनवीन प्रयोग होत असून येणाऱ्या नवीन औषधांच्या बाबतीतही त्यांची परिणामकारकता, किंमत, उपलब्धता याबाबत आतापासूनच माहिती घेत राहावी व संबंधितांच्या संपर्कात राहावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.