लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

- Advertisement -

लहान मुलांमध्ये कोविड आणि कोविड्शी संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा, कोविडविरुद्धची आपली एकजुटीची साखळी मजबूत ठेवून या विषाणूला पराभूत करू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज्यातील ६ हजार ३००  बाल रोग तज्ञांना राज्य शासनाच्या कोविड विषयक बाल रोग तज्ञ टास्क फोर्सने वैद्यकीय उपचाराबाबत व्यवस्थित मार्गदर्शन करण्यासाठी व्हिडीओ कान्फरसद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

पहिल्या लाटेत  ज्येष्ठ नागरिक आणि दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला. संसर्गाचं वय खाली आलंय. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आपल्या लहान मुलांच्या बाबतीत आपण काय करावे आणि काय करू नये ते नेमके आपल्या डॉक्टर्सकडून समजून घ्या. डॉक्टर्सनी देखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे, योग्य मार्गदर्शन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोना विरुद्ध आपण जी लढाई लढतो आहोत त्यात पूर्ण यश नाही पण रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश येतेय पण यात तुम्ही सगळे डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा, सरकारला सहकार्य करणारे सर्व पक्षांचे लोक, सर्वसामान्य नागरिक यांचे हे यश आहे, मी केवळ निमित्तमात्र आहे. असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

राज्य शासनाने बाल रोग तज्ञांच्या टास्क फोर्सची स्थापना केली असून डॉ.सुहास प्रभू हे या अध्यक्ष असून डॉ.विजय येवले, डॉ. परमानंद आंदणकर हे सदस्य आहेत. या तज्ञांनी लहान मुलांमधील कोविड संसर्गावर मार्गदर्शन केले तसेच वैद्यकीय उपचाराबाबत विस्तृत माहिती दिली.

कोरोनाचा कहर वाढत असताना कडक निर्बंध लावण्यासारखे कटू निर्णय घ्यावे लागले यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. कोरोनाचा धोका पूर्णत: टळलेला नाही हे लक्षात घेऊनच काम पुढे चालू ठेवावे लागेल असे ते म्हणाले

लसीकरणाच्या बाबतीतही १८ ते ४४ वयोगटातील वर्गासाठी १२ कोटी लसी एक रकमी घेण्याची आमची तयारी आहे पण लसी उपलब्ध नाहीत हीच अडचण आहे. आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत आणि मला खात्री आहे, जून नंतर लस पुरवठा सुरळीत सुरु होईल आणि आम्ही महाराष्ट्रातील  सर्व नागरिकांचे लसीकरण  वेगाने सुरु करू शकू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.