अमेरिकन कंपनीला भारतात करायचीय 36 लाख कोटींची गुंतवणूक, सोशल मीडियावर उडत आहे खिल्ली

0

- Advertisement -

नवी दिल्ली: सध्या इंटरनेटच्या युगात कोण-कधी-कशाप्रकारे-कोणाला-काय ऑफर करेल याचा काही नेम राहिला नाही. मागेच काही महिन्यांपूर्वी एनडीटीव्हीच्या एका ज्येष्ठ महिला पत्रकाराला ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरीची ऑफर आली होती. त्यांनी ती ऑफर स्विकारलीही होती आणि येथील नोकरीचा राजीनामाही दिला होता. मात्र, नंतर ती ऑफर फक्त एक फसवणूक होती हे लक्षात आल्यानंतर त्यांचा पोपट झाला. ही बातमी सोशल मीडियावर अनेक दिवस चर्चेत होती.

तसाच काहीसा प्रकार सध्या घडताना दिसत आहे. कथितरित्या अमेरिका स्थित एका  कंपनीने भारतात तब्बल 500 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारतीय रुपयात या रक्कमेचे मूल्य जवळपास 36 लाख कोटी पेक्षा जास्त आहे. कंपंनीच्या चेअरमनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘न्यू इंडिया’ व्हीजनला हातभार लावण्याची कंपनीला संधी देण्याचे आवाहन केले आहे.

कंपनीचे नाव ‘लँडॉमस रियल्टी व्हेंचर्स (Landomus Realty Ventures)’ आहे. कंपनीचे चेअरमन प्रदीप कुमार सत्यप्रकाश यांनी म्हटले की, ‘इन्व्हेस्ट इन इंडिया (Invest in India)’ या उपक्रमा अंतर्गत सरकारने सूचीबद्ध केलेली नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन (एनआयपी) आणि नॉन-एनआयपी प्रकल्पांमध्ये ह्या रक्कमेची गुंतवणूक आहे.

एका प्रसिद्ध वृत्तपत्रात निवेदन जाहीर करत या कंपनीने भारतात गुंतवणूक करण्याची इच्छा दाखवली आहे. तसेच या कंपंनीच्या चेअरमनने भारताचे नवनिर्माण आणि 5 ट्रिलियन डॉलर्सच्या जीडीपी चे लक्ष्य साध्य करण्यासाठी मदत करण्याचे कंपनीचे ध्येय असल्याचे सांगितले.

मात्र, हे सर्वकाही लोकांना पटत नसून या गोष्टींवर कोणाचाही विश्वास बसत नसल्याचे सोशल मीडियावर दिसत आहे. अनेक व्यक्तींनी हे सर्व काही हास्यास्पद असण्याची टीका केली आहे.

- Advertisement -

एका ट्विटर युजरने लिहिले की, ‘लँडॉमस रियल्टी व्हेंचरमध्ये 19 लोक आहेत आणि कंपनी फक्त 3 दशलक्ष डॉलर्स कमावते. मग ते भारतात 500 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक कशी करू शकतात? हा कसला विनोद आहे? या दिशाभूल करणार्‍या जाहिरातीबद्दल सरकारने त्यांच्यावर गंभीर कारवाई केली पाहिजे?’

एकाने तर ही जाहिरात पाहून ‘Freedom 251’ मोबाइलची आठवण आल्याचे सांगितले.  2016 मध्ये एका व्यक्तीने 251 रुपयांमध्ये भारतीयांना स्मार्टफोन देणार असल्याचे सांगितले होते. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या फोनचे उद्घाटन झाले होते. खुद्द मोदींनी याचे उद्घाटन केल्यामुळे लाखो लोकांनी हा फोन 251 रुपये खर्च करून बूक केला होता. मात्र, हे नंतर फक्त फसवणूक आहे हे सिद्ध झाले.

तुम्हाला याबाबत काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा.

 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.